Ashtvinayak Lenyadri ganapti | अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती श्रीगिरिजात्मज विनायक –
लेण्याद्रि माया सा भुवनेश्वरी शिवसती देहाश्रिता सुंदरी।
विघ्नेशं सुतमाप्तकाम संहिता कुर्वेत्तेपो दुष्करम ।।
तख्या भूत्प्रकट प्रसन्नवरदो तिष्ठतया स्थापित ।
वंदे ह गिरिजात्मज परमजं तं लेखनाद्रिस्थितम ||५||
अर्थ :- ती मायारूपी जगन्माता, शिवपत्नी पार्वती जिने सौंदर्याला आपल्या देहात आश्रय दिला आहे, जिने पुत्रप्राप्तीसाठी कडक तप केले आणि अखेर श्रीगणेशच तिला पुत्र म्हणून प्राप्त झाला अशा ह्या गिरिजेच्या, पार्वतीच्या पुत्राला, लेण्याद्रि पर्वतावर स्थानापन्न झालेल्या शिवपुत्राला माझे वंदन असो.
अष्टविनायक क्षेत्रांपैकी डोंगरावर असलेले आणि फ्रौद्ध लेण्यांच्या सान्निध्यातील एकमेव क्षेत्र म्हणजे लेण्याद्रि आणि इथला विनायक म्हणजेच गिरीजात्मज (अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री ) विनायक.
श्रीक्षेत्र लेण्याद्रिचे भौगोलिक स्थान व मार्ग :-
लेण्याद्रि पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या उत्तर – पश्चिम तीरावर आहे. गणेशपुराणामध्ये या जागेला जीर्णपूर किंवा लेखनपर्वत अशी नावे आहेत. जुन्नर आणि गोळेगाव, गावांमधून कुकडी नदी वाहते. तर पश्चिम आणि पूर्वेला मणिकडोह आणि एडगावचे जलाशय नजरेत येतात.
१) पुणे-नाशिक महामार्गावर चाकण – राजगुरूनगर-मंचर – नारायणगावाहून जुन्नुर मार्गे लेण्याद्रि हे अंतर पुण्यापासून ९४ कि.मी. आहे.
२) येथे येण्यासाठी प्रथम जुन्नरलाच यावे लागते. मुंबई – जुन्नर अशा थेट एस.टी. गाड्या आहेत.
३) पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून एस.टी.गाड्या सुटतात. ४) जुन्नरपासून लेण्याद्रि ५ कि.मी. वर आहे.
५) मंदिराच्या एकूण ३०७ पायऱ्या चढून जाण्याची शक्ती नसले तर आशा भक्तांसाठी पायथ्याशी डोलीची व्यवस्था होऊ शकते.
श्रीगिरिजात्मजाचे मंदिर :
डोंगरावर असलेल्या प्रौद्धकालीन गुंफामधील आठव्या गुफेत श्री गिरिजात्मज विनायकाचे मंदिर आहे. या लेण्यांना गणेश लेणीही म्हटलं जाते. पायथ्यापासून मंदिर गुंफेच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी एकंदर तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात. पायथ्याशीच थंड पाण्याची पाणपोई आहे. मंदिर दक्षिणाभिमुख आहे. या देवळाचे वैशिष्ट्य असे की. संपूर्ण मंदिर एकाच दगडात कोरलेले आहे. ५३ फुट लांब आणि ५१ फुट रूंद असलेल्या प्रशस्त सभामंडपात एकही खांब नाही. सभामंडपात एकूण अठरा ओवऱ्या (ध्यानधारणा करण्याची जागा) असून त्यातील मधल्या एका ओवरीत गिरिजात्मजाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.
प्रत्यक्ष मंदिराचा सभामंडप उंचीने लहान म्हणजे ७ फुट आहे. या लहान दालनात दर्शनी कोरलेले सहा दगडी खांब आहेत. खांबाच्या वरच्या बाजूला हत्ती, वाघ, सिंह यांचे मुखवटे आहेत.
गिरिजात्मज विनायकाची मूर्ती:-
मंदिर दक्षिणाभिमुख तर मूर्ती उत्तराभिमुख आहे. ज्या गुहेत पार्वतीला गणेश प्रसन्न झाला त्या गुहेतच पार्वतीने गणेशाची स्थापना केली.
येथे गणेशाची स्वतंत्र, आखीव रेखीव मूर्ती नाही. या लेण्यात कोणीतरी दगडी भिंतीवर गणेशाची मूर्ती खोदलेली आहे. हया मूर्तीवर पूर्वी कवच होते, तेव्हा ती पाठमोरी आहे असे वाटे. परंतु ते कवच | पडल्यावर आता डाव्या बाजूला मान वळलेली श्री गिरीजात्मजाची मूर्ती दिसते. त्यामुळे मूर्तीला एकच डोळा दिसतो.
येथील छोट्याशा गाभाऱ्यात कोणालाही स्वहस्ते श्रींची पूजा करता येते हे येथील वैशिष्ट्य.
नित्य कार्यक्रम व उत्सव :-
दररोज प्रातःकाली गिरिजात्मजाची पंचामृती पूजा केली जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी व माघ शुद्ध चतुर्थी असे दोन मोठे उत्सव असतात. माघी उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. माघ महिन्यात ७ दिवस अखंड हरिनाम सप्ताह असतो. गणेश जयंतीला गणेश जन्माचे किर्तन, बैलगाड्यांच्या शर्यती इत्यादी कार्यक्रम होतात. भाद्रपद चतुर्थीस सकाळी अभिषेक, किर्तन इत्यादी कार्यक्रम होतात.
अन्य उपयुक्त माहिती :-
१) पुरातत्व विभागाकडे लेण्याद्रिवरील लेणी असली तरी गणेश मंदिराची व्यवस्था मंदिर ट्रस्टकडे आहे.
२) भक्तांच्या राहण्यासाठी देवस्थानने यात्री निवास बांधले आहे. ३) लेण्याद्रिस १७/१८ बौद्ध लेणी आहेत म्हणूनच यास लेण्याद्रि म्हणतात. मंदिराच्या पश्चिमेकडील लेण्यात एक सुंदर स्तूप असून त्याला भीमाची गदा म्हणतात. याठिकाणी आवाज घुमतो. डोंगराच्या माथ्यावर महादेवाचे स्थान आहे.
४) शिवछत्रपतींचा जन्म जेथे झाला तो शिवनेरी किल्ला लेण्याद्रिपासून ५-६ कि.मी. वर आहे.
५) तुकाराम महाराजांच्या गुरूपरं परे तील आदिपुरूष राघव चैतन्य महाराज यांनी लेण्याद्रिस अनेक वर्षे आराधना केली होती.
६) भक्तांच्या धार्मिक कृत्यांची सोय देवस्थानतर्फे केली जाते. अभिषेक, सहस्त्रावर्तने, पूजा इ. सेवेचे प्रकार आहेत. फोटो काढता येतो.
७) मंदिर पुरातत्व खात्याकडे असल्यामुळे मंदिरात विजेचा दिवा नाही. देवालयाची रचना अशी केली आहे की सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत गणेशाच्या मूर्तीवर उजेड असतो. गणेशाची मूर्ती डोंगराच्या भिंतीत असल्यामुळे गिरिजात्मजाला प्रदक्षिणा घालता येत नाही.
८) लेण्याद्रि पर्वतावर वस्ती, वर्दळ नाही.
“जया आवडे एकांत, तया भेटे सरस्वतीकांत!
इथे एकांतात यावे, ध्यानधारणा करावी, पार्वतीमातेने तपस्या बळावर मिळवलेल्या ह्या पार्वतीकुमार श्री गिरिजात्मजाचा आशिर्वाद घ्यावा.
।। श्री गिरिजावरदो गिरजात्मजो जयति ।
श्री गिरिजात्मज विनायकाची पौराणिक कथा :-
हिमालयकन्या पार्वतीने गजानन आपला पुत्र व्हावा म्हणून लेण्याद्रि पर्वताच्या गुहेत बारा वर्षे तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईन. तुझे आणि भक्त लोकांचे मनोरथ पूर्ण करीन, असा पार्वतीला वर दिला. त्यानंतर भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने आपल्या अंगच्या मळीने गजाननाची मूर्ती बनवली. गजाननाच्या त्या पार्थिव मूर्तीची पूजा केली असता श्रीगजाननाने त्यात प्रवेश केला आणि बटुरूपाने तो पार्वतपुढे प्रकट झाला. तेव्हा त्याला सहा हात, तीन डोळे आणि सुंदर शरीर होते. देवांनी या मुलाचे नाव गणेश (सत्व, रज, तम या गुणांना स्वाधी ठेवतो तो गणेश) ठेवले.
गिरिजात्मज विनायकाने येथे पंधरा वर्षे वास्तव्य केले. गौतम मुनींनी येथेच गणेशाची मुंज केली. गणेशाने अनेक दैत्यांचा संहार केला. लेण्याद्रिने त्याच्या बाललीला पाहिल्या आणि महापराक्रमाचा साक्षीदार लेण्याद्रि ठरला. पार्वतीचा म्हणजेच गिरिजेचा आत्मज म्हणजे मुलगा आशा प्रकारे येथील गणेशास गिरिजात्मज (अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री) असे म्हणतात. Ashtvinayak Lenyadri ganapti
https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg
तुमच्या शरीराला या डाएट ची गरज आहे का ! ग्लुटेन फ्री म्हणजे नेमके काय ?
Ganeshpatri Uses: दूर्वा सोडुन अजून 21 गणेशपत्री कोणत्या व त्यांचे औषधी उपयोग जाणून घ्या !
जूने लोक का सांगतात आई वडील व थोरामोठ्यांना नमस्कार करावा वैज्ञानिक दृष्टिकोण नक्की वाचा !