Holi Festival: फाल्गुन पौणिमेलाच हुताशनी पौर्णिमा असे म्हणातात. या दिवशी साजरा केला जाणारा ऋतुंचा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संपताच राजा असलेल्या ऋतूमध्ये वसंताचे आगमन होते. धरतीमाता नवनवीन पानाफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा, उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गर्जत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशावेळी हा आनंद वाढविण्यासाठी या होळीच्या सणाचे खूप महत्व आहे .
उत्तर भारतात यालाच दोलायात्रा किंवा होरी (Holi Festival) म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा असे म्हणतात याचाच अर्थ हा की भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरा केला जातो हे विशेष. यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते. हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा केला जातो .
खरं म्हणजे होळी (Holi Festival) हा सण निसर्गाची एक संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. संक्रमण म्हणजे बदल. विविध झाडांची पाने गळत असतात , वनश्रीची शोभा नाहिशी झालेली असते. सारे थंडीने बेजार झालेले असतात. आता या स्थितीत बदल होणार असतो, प्राणीमात्रात जोम उत्साह येणार असतो, ते सांगणारा हा सण; थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंदोत्सव.
पानझडीने सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो. काड्याकुड्या साठलेल्या असतात. त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार; याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल म्हणून पौर्णिमेच्या शुभदिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविले आहे. परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे.
होळी (Holi Festival) ची कथा :
हिरण्यकश्यपुचा मुलगा जो सर्वाना माहीत आहेच भक्त प्रल्हाद हा विष्णुचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपुने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णाचे सारखे नाम जप करू नये म्हणून हिरण्यकश्यपुने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, तसेच उकळत्या तेलाच्या कढईत देखील टाकले.
तरीही भक्त प्रल्हादावर त्याच्या काही एक परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपुची बहीण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासुन मला कोणतेस भय नाही, मी जळणार नाही, प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते आणि त्या प्रमाणे हिरण्यकश्यपुची बहीण हुंठा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गोवऱ्या रचुन पेटविले गेले.
पण काय आश्चर्य वर मिळालेली हुंठा ही मात्र अग्नित जळून भस्म झाली. भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतुन जसाचा तसा सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुध्द बनले. प्रल्हादाची जणू ही अग्नीपरीक्षाच होती.
त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते तीच ही होली; म्हणून होळीचे महत्व आहे.
सारांश-होळीचा सण, उत्सव, फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा, वसंतातही संयमाची दिक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजविणारा व मानव मनात, समाजात असलेल्या आसुरीवृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे.
तुम्ही तर करत नाहीत ना या देवघर संबंधी चुका !देवघर व देव्हारा कसा असावा या विषयी नियम
वैज्ञानिकदृष्टया महत्व -
उन्हाळा जस जसा सुरू होत असतो, तशी जमीन भाजून निघते. तिच्यातुन उष्ण वाफारे निघतात. घराच्या भोवती पानांची ती कुजलेली घाण तशीच असेल तर त्यातून येणारी घाण आरोग्याला हानीकारक असते म्हणून तीची होळी करणे आवश्यक आहे.
स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देणाऱ्या उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञापुर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन आणि स्वागत..
पावरा समाजातील होळी (Holi Festival) –
या समाजामध्ये इतर आदिवासींप्रमाणे पावरा लोकांत होलिका दिवस सगळ्यात मोठा सण असतो. होलिका देवीस पावरी भाषेत हुवी, हवावी, कली असेही म्हणतात. पावरा लोकांचा सर्वात मोठा सण म्हणजे होळी. ही देवी आपल्यावर कृपाछत्र ठेवते, आपली मनोकामना पुर्ण करते, अशी या पावरा लोकांची श्रध्दा आहे.
होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या सुमारास साजरा करतात. या काळात शेतीचा हंगाम संपलेला असतो. जंगल फळाफुलांनी बहरलेले असते. होलीका देवीच्या कृपेने आपण सुखीसमाधानी राहू अशी पावरा समाजाची श्रध्दा आहे.
उत्तरेतील होळी (Holi Festival) :
उत्तरेत हा उत्सव कृष्णासाठी आहे असे मानतात. कृष्ण तान्हा असतांना त्याला मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीला पाठविले होते. कृष्णाने तिचे ते कपट ओळखले आणि तिचे दुध पितापिता तिचे प्राणही प्राशन केले आशा या पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले असे ते लोक मानतात.
महाराष्ट्रातील होळी (Holi Festival):
महाराष्ट्रात प्राचीन काळी ढुंठा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे. तिला हुसकावुन लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता. त्यामुळे ती पळुन गेली.
दक्षिण भारतात (Holi Festival) :
हा उत्सव कामदेवासाठी मानतात. भगवान शंकर आपल्या तपश्चर्येत मग्न होते. देवांनी शंकराचे लक्ष माता पार्वतीकडे वेधण्याचे काम त्यांनी कामदेवाला सांगितलेले होते . ते जेंव्हा शंकराला समजले तेंव्हा ते रागावले, त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला किंवा मदनाला जाळून टाकले. त्याची आठवण म्हणून दक्षिणेत या कामदेवाचा पुतळा तयार करून तो जाळण्याची प्रथा आहे.
उद्देश एवढाच की, अनेक ठिकाणी उन्हाळ्याचे दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते तेव्हा अग्नीला शांत करण्याकरिता ही पौर्णिमा साजरी केली जाते. यादिवशी वरीलप्रमाणे अग्नीची पूजा करतात.
हा सण कसा साजरा करतात :
या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढुन मध्ये शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्याभोवती लाकडे गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
खेडेगावात सगळे गाव मिळुन गोवऱ्या लाकडे गोळा करतात आणि सावर्जनिक ठिकाणी होळी साजरी करतात. तिची पूजा करतात, आणि नंतर त्यामध्ये नारळ अर्पण करतात. खोबऱ्याच्या वाट्या भाजुन प्रसाद वाटतात. प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी.
होळी पूजन (Holi Festival) असे करा :
नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणुन होळीचे करतो असा संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्याची पंचोपचार पूजा करावी. व नैवेद्य द्यावा.
तसेच घरात उपद्रव त्रास देणाऱ्या किटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे जिवाणू नष्ट होतात. होळीला ३ प्रदक्षिणा घालाव्या. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने त्याच्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, वाईट प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडुन द्याव्यात. हाच या सणाचा संदेश.
वटसावित्री, नागपंचमी, हरितालीका हे जसे स्त्रीयांचे सण आहेत त्याचप्रमाणे होळी हा पुरुषांचा सण आहे.;जुने जाऊ द्या मरणालागुनी । जाळुनी किंवा पुरून टाका
असे केशवसुतांनी म्हटले आहे. पाच दिवस हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा करतात. तर ५ व्या दिवशी मात्र रंगपंचमीला सर्वाशी वैमनस्य सोडुन देऊन प्रसन्नतेचे रंग आपण उधळातो आणि आनंद लुटतो .