Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती
महड भक्ताभिमानी गणराज एकः ।
क्षेत्रे मढाख्ये वरदः प्रसन्नः //
यस्तिष्ठती श्रीवरदो गणेशः ।
विनायकस्त प्रणमामि भक्त्या //८//
अर्थ : भक्तांविषयी अभिमान बाळगणारा, गणांचा अधिपती गढ नावाच्या क्षेत्रामध्ये वास करणारा, ज्याचे रूप प्रसन्न करणारे आहे अशा श्रीवरदविनायकाला माझा भक्तीपूर्वक नमस्कार.
मनोवांच्छित वर देणाऱ्या वरदविनायकाच्या देवळातील नंदादीप इ.स. १८९२ पासून गेली १०७ वर्षे अव्याहत तेवत आहे, हे इथले वैशिष्ट्य. महडच्या भोवतालचा प्रदेश निसर्गरम्य आ
हे. प्राचीन काळी ह्या क्षेत्राचे नाव भद्रक किंवा मढक असे होते आणि अनेक ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले होते. ( Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती )
भौगोलिक स्थान व मार्ग :
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड गावात श्रीवरदविनायक
विराजमान आहेत.
–
१) मुंबई – पनवेल – खोपाली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे ६ कि.मी.
अंतरावर हाळ येथे उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई पासून महड चे अंतर ८३ कि.मी. आहे.
२) मुंबई – पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी. आहे आणि खोपोलीपासून ६ कि.मी.
श्रीवरदविनायक पौराणिक कथा :-
फार प्राचीन काळी विदर्भ देशातील कौंडिण्य नगरच्या भीम राजाला श्रीगणेशाच्या एकाक्षर मंत्राच्या जपाने एक मुलगा झाला. त्याचे नावरूक्मानंद. रूक्मानंद मोठा झाल्यावर राजाने त्यास युवराज बनवले व गणेशाच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला.
एके दिवशी युवराज रूक्मानंद शिकारीसाठी वनात गेला असता त्यास वाचक्नवि ऋषींचा शोभायमान आश्रम दृष्टीस पडला. युवराज तहानलेला असल्यामुळे त्याने आश्रमात ऋषीपत्नी मुकुंदा हिच्याकडे उदक प्यावयास मागितले. त्या सुंदर रूक्मागंदाला पाहिल्याबरोबर मुकुंदा त्याच्याकडे आकर्षित झाली व तिने त्याच्याकडे विपरित मागणी केली. तिच्या या मागणीमुळे रूक्मागंदास फार दुःख झाले व त्याने तिला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडून मुकुंदेने रूक्मागंदाला ” तू कुष्ठरोगी होशील ” असा शाप दिला. शाप मिळताक्षणी सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रूक्मागंदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रुप झाले. दुःखी रूक्मागंदाने नारदमुनींच्या आदेशानुसार कदंब नगरीतील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी विनायकाची (थेऊर स्थित) आराधना केली. त्यामुळे रूक्मागंद शापमुक्त झाला.
इकडे मुकुंदेची कामविव्हळ अवस्था लक्षात घेऊनइंद्राने रूक्मागंदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून तिला पुत्र झाला. वाचक्नवी ऋषीस मुकुंदेच्या या पापकर्माची माहिती नसल्यामुळे त्यांनी मुकुंदेच्या पुत्रास आपलाच पुत्र समजून त्याचे जातकर्मादि संस्कार मोठ्या आनंदाने केले व त्याचे नावे गृत्समद असे ठेवले. गृत्समद पाच वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याचे उपनयन केले आणि ;गणांना त्वा गणपती ह्या गणेशमंत्राचा उपदेश केला.
कित्येक दिवसानंतर मगध देशाचा राजा मागध याच्याकडे श्राद्ध होते. त्या श्राध्दास त्याने, अत्रि, वसिष्ठ, विश्वामित्र इत्यादी महातपस्वी ऋषींस बोलावले होते. शास्त्रचर्चेत गृत्समद ऋषी भाषण करू लागताच अत्रिऋषींनी त्याचा धिक्कार केला. ते म्हणाले, “गृत्समदा, तू आमच्या समोर भाषण करण्यास योग्य नाही. तुझा जन्म ऋषीपासून झालेला नसून तू रूक्मानंद राजाचा पुत्र आहेस. तू वाचक्नवी ऋषींचा औरस पुत्र नसल्यामुळे तुझी व आमची बरोबरी कशी होईल । तू आपल्या आश्रमात परत जावे हे बरे।
अत्रिऋषींचे भाषण ऐकून गृत्समदाला अत्यंत क्रोध आला व तो तसाच तडक आपल्या मातेपाशी गेला आणि क्रोधाने म्हणाला, “माझा जन्म कोणापासून झाला ते खरे सांग नाहीतर तुझे भस्म होईल.” पुत्राचे हे निकराचे भाषण ऐकून मुकुंदेने त्याला सर्व हकीकत निवेदन केली. सत्य समजताच गृत्समदाने ” तू काटेरी बोर होशील, तुझ्यावर पुष्कळ फळे येतील पण एकही प्राणी त्यास स्पर्श करणार नाही.” असा शाप माता मुकुंदेस दिला. हा शाप ऐकून मुकुंदेलाही राग आला. ती म्हणाली, “मी तुझी माता असल्यामुळे तुला पुज्यच आहे, तू माझा अनादर करून मला शाप दिला तर तूही माझा शाप घे । तुझ्यासारखा पाषाण हृदयी पुत्र जन्मास आला असता किती दुःख होते याचा अनुभव तुला यावा म्हणून मी ही तुला शाप देते की, त्रैलोक्याला भय देणारा असा क्रूर, पाषाणहृदयी राक्षस तुझ्या पोटी जन्माला येईल ।” याप्रमाणे त्या दोघांनी परस्परांस शाप दिला. इतक्यात ” गृत्समद हा इंद्राचा पुत्र आहे ” अशी आकाशवाणी झाली. मुकुंदेचे शापाने तात्काळ बोरीच्या काटेरी झाडात रूपांतर झाले. गृत्समदही लज्जित अंतःकरणाने तपश्चर्येस निघून गेला.
गृत्समदाने तपश्चर्येसाठी पुष्पक नावाचे अरण्य निवडले आणि तेथेच तपश्यर्चा करण्यास प्रारंभ केला. अनेक वर्षे तेथे तपश्चर्या केल्यामुळे गजानन त्यास प्रसन्न झाले व त्यांनी गृत्समदास वर मागण्यास सांगितले, तेव्हा गृत्समद म्हणाला, “देवा, मला ब्रह्मज्ञज्ञन होवो व तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना होऊन मी देव व मनुष्य यांस पूज्य व्हावे असे कर, तसेच हे वन अत्यंत पवित्र व भक्तांना सिद्धीदायक होवो व भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तू येथे वास्तव्य करावे." गजानन म्हणाले, “गृत्समदा मी तुला ब्राह्मणत्व दिले. इतकेच नव्हे तर तुझी गणना वेदवेत्या ऋषींमध्ये होईल. ” गणांना त्वा ” या मंत्राचा तू ऋषी होशील आणि त्यामुळे माझे स्मरण करण्यापूर्वी लोक प्रथम तुझे नाव घेतील व एका शंकरावाचून इतरांना जिंकला न जाणारा असा महापराक्रमी पुत्र तुला होईल. सध्या कृतयुग असल्यामुळे या युगात या क्षेत्राला ” पुष्पक “म्हणतील, त्रेतायुगात यालाच मणिपूर म्हणतील, द्वापारात ” मानक ” आणि कलियुगात ” भद्रक ” म्हणतील. या क्षेत्रात स्नान आणि दान करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.असा वर देऊन गजानन निघून गेल्यावर गृत्समदाने उत्तम प्रकारचे देवालय निर्माण केले आणि त्यातील मूर्तीचे वरद विनायक (भक्तांना वर देणारा) असे नावे ठेवले.
मुकुंदेच्या शापाप्रमाणे व गजाननाच्या वराप्रमाणे गृत्समदासत्रिपुरासूर नावाचा उन्मत व पराक्रमी पुत्र झाला व त्याचा वध शिवशंकरानी केला. (रांजणगावच्या महागणपतीची पौराणिक कथा वाचावी) गृत्समद ऋषीस गाणपत्य सांप्रदायाचा आद्य प्रवर्तक मानले जाते.
श्रीवरद विनायकाचे मंदिर व मूर्ती :
श्रीवरदविनायकाची स्वयंभू मूर्ती इ.स. १६९० मध्ये श्री. धोंडू पौडकर यांना तळ्यात सापडली. तळ्याजवळच गावदेवीचे देऊळ आहे.
तेथे काही काळ ही मूर्ती होती. नंतर इ.स. १७२५ साली वरदविनायकाचे देऊळ बांधण्यात आले. त्यासाठी पेशव्यांचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर (कल्याणचे सुभेदार) यांनी पुढाकार घेतला आणि हा गाव देवस्थानसाठी लावून दिला. ह्या मंदिरास छत्रपती शाहू महाराज व पेशव्यांनी सनद दिली होती.
श्रीवरदविनायकाचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. आता मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. पूर्वी मंदिराचे बाह्यरूप एखाद्या कौलारू घराप्रमाणे होते. मंदिराच्या चारही बाजूंना दोन- दोन हत्तींच्या मूर्ती कोरल्या आहेत. उत्तरेला गोमुख असून त्यातून तीर्थ खाली पडते. पश्चिमेला देवाचे तळे आहे. मंदिरातील सभामंडप ८ फूट लांब व ८ फूट रूंद आहे. घुमटाची उंची २५ फूट असून कळस सोनेरी आहे. घुमटावर नागाची नक्षी आहे.
गाभाऱ्यात प्रवेश करताक्षणी ऋद्धी-सिद्धीच्या कोरीव व दगडी मूर्ती दिसतात, दोन्ही बाजूंना कोनाड्यात गणेशाच्या दोन मूर्ती आहेत. त्यातली डावीकडची मूर्ती शेंदूरचर्चित आहे व उजवीकडची मूर्ती संगमरवरी उजव्या सोंडेची आहे.
गाभाऱ्यात दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर श्रीवरदविनायकाची मूर्ती आहे, मूर्ती डाव्या सोंडेची असून बैठी व पूर्वाभिमुख आहे.
नित्य कार्यक्रम व उत्सव :-
श्रीवरदविनायकाची त्रिकाळ पूजा होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे येथील दोन प्रमुख उत्सव आहेत. माघी चतुर्थीला दहा हजारावर भाविक येतात. गणेश जन्मोत्सवाच्या वेळी देवाच्या प्रसादाचा नारळ घेतल्यास बळकट इच्छा असणाऱ्या दांपत्याला पुत्रप्राप्ती होते असे भाविकांचे अनुभव आहेत. या देवाची पूजा कोणालाही स्वहस्ते करता येते. वदरविनायकाची श्रद्धेने सेवा केल्यास साक्षात दर्शन घडते असा भक्तांचा अनुभव आहे.
अन्य उपयुक्त माहिती :-
१) यात्रेकरूंना स्वहस्ते श्रीगणेशाची पूजा दुपारी १२ पर्यंतची करता येते. त्यानंतर कोरडी पूजा करता येते.
२) भक्तांची धार्मिक कृत्ये (पूजा, एकादशणी, सहस्त्रावर्तने इ.) देवस्थानतर्फे योग्य ती देणगी घेऊन केली जातात. प्रसाद व अंगारा पोस्टाने
पाठवतात.
३) यात्रेकरूंसाठी भव्य भक्तनिवास बांधले आहे.
४) रोज दुपारी प्रसादालयात भाविकांच्या भोजनाची सोय केली आहे.
महड आणि त्याच्या भोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात तर येथील शोभा अवर्णनीय आहे. येथील वस्ती कोकणातील वस्तीप्रमाणे विरळ विरळ असते. ध्यानधारणा आणि ईश्वरोपासनेसाठी महडच्या श्रीवरदविनायकाचा परिसर अतिशय रम्य आहे. वरदविनायकाच्या मंदिरापासून जवळच गगनगिरी महाराजांचा मठ आहे.
॥ श्रीमदवरदविनायको विजयते ॥ Travel Ashtvinayak | श्रीवरद विनायक – महड चा गणपती
Ashtvinayak Lenyadri ganapti | अष्टविनायक गिरीजात्मक लेण्याद्री गणपती संपूर्ण माहिती
Shravan Maas 2023 seva [श्रावण मास 2023 सेवा]
मार्गशीर्ष महिन्यात करायचा खंडेराव नवरात्र चा म्हणजेच चंपाषष्ठी चा उत्सव कसा करावा
Healthiest Ever | Chocolate Mouses | Best Guilt free Recipe [अत्यंत पौष्टिक असे चॉकलेट मौसिस ]